Ad will apear here
Next
‘टू सर.... विथ लव्ह... अँड रिस्पेक्ट!’


१९७५च्या जून महिन्यात शाळा नेहमीप्रमाणे सुरू झाली. नूतन मराठी विद्यालय. मी आठवीत होतो त्या वर्षी. तुकडी सी. एकदम कोपऱ्यातला वर्ग. पहिले काही दिवस वेळापत्रक जमण्यातच गेले. मराठीचे ‘सर’ अजून तास घ्यायला आले नव्हते. छोट्या सुट्टीच्या आधीचा मराठीचा तास. ‘कोण येणार?...’ ही उत्सुकता होतीच प्रत्येकाच्या मनात. दुसऱ्या आठवड्यातील पहिलाच दिवस. मराठीच्या तासाला ‘सर’ आले. त्यांना शाळेत इतरत्र पाहिले होते; पण ते आतापर्यंत माझ्या तुकडीला कधी शिकवायला आले नव्हते. त्यांच्या शांत चेहऱ्यावरून त्यांच्या स्वभावाचा अंदाज करण्याचं वयपण नव्हतं ते.

त्यांनी मुलांना पुस्तकं बाकावर उघडून ठेवायला सांगितली. काही मुलांनी अजून पुस्तकं विकत घेतली नव्हती. मीही त्यापैकीच एक. अशा मुलांनी शेजारील मित्राच्या पुस्तकात बघायचं. सरांच्या हातात एक पुस्तक होतंच. धड्याचं वाचन सुरू झालं. एक एक परिच्छेदाचं वाचन. त्याचा सविस्तर अर्थ. मगच पुढचा परिच्छेद. अत्यंत शांत वातावरणात तो धडा उलगडत जात होता. आधीच्या मराठीच्या सरांची पद्धत व ही पद्धत यात खूपच फरक होता. सर्व मुलं आत्मीयतेने ऐकत होती. सर बाकांच्या मधल्या भागातून येरझारा घालत शिकवत होते.

माझा बाक वर्गाच्या सगळ्यात कोपऱ्यात. त्यातून वर्गाच्या बाहेर पडण्याचे दार बाकाला लागूनच. मान वळवली, की बाहेरील डावा व उजवा दोन्ही व्हरांडे एका नजरेत दिसायचे. सुट्टीची घंटा होण्याचा अवकाश, अस्मादिक एका क्षणात बाहेर पसार... अशी उपयुक्त रचना. माझा शेजारी होता रेणुसे नावाचा मुलगा. धड्यातील कोणत्या तरी शब्दाने रेणुसे फिसकन हसला. त्याने मलाही खूण केली. आम्ही दोघेही खाली मान घालून हसत होतो.

सरांच्या येरझारा चालूच होत्या. ते कधी माझ्या शेजारी आले कळलेच नाही. माझी मान वर झाली अन् सरांची नजर माझ्या नजरेला भिडली. त्यांनी डाव्या हातातले पुस्तक तसेच ठेवून उजव्या हाताच्या बोटाने मला उभे राहण्याची खूण केली. मी यंत्रवत उभा राहिलो. काही कळायच्या आत सरांच्या उजव्या हाताने माझ्या डाव्या सुकुमार गालावर नक्षी उठवली. नजरेसमोर एकदम चांदण्याच चांदण्या! पुढच्याच क्षणाला त्यांचे शिकवणे त्याच तल्लीनतेने सुरू झाले. जणू काही घडलेच नाही. माझ्या आठवणीत शाळेत मला बसलेला तो पहिलाच मार. गालावर हात धरून कसे तरी शेजारील पुस्तकात डोळे घातले. सरांच्या पुढच्या फेरीला त्यांच्या लक्षात आले, की माझ्याकडे पुस्तक नाही. त्यांनी मला शेजारील वर्गातील कोणा मित्राचे पुस्तक घेऊन ये अशी आज्ञा केली. मी बाहेर जाऊन पुस्तक घेऊन आलो.

सरांच्या पद्धतीप्रमाणे सर्व धड्याचे वाचन व शिकवणे झाले, की दोन्ही हातांनी चुटक्या वाजवून ‘चला, आता याच्यावरच्या नोट्स काढा’ अशी त्यांची सूचना. मुलांनी आपापल्या वह्यांत त्याच्या सुटसुटीत अशा वाक्यांमध्ये योग्य असा समास सोडून नोट्स काढायच्या. सर्व वर्ग नोट्स काढण्यात गर्क झाला. तीन ते चार शब्दांच्या ओळी असलेल्या त्या नोट्स नंतर कायम स्मरणात राहतील अशाच. मीपण नोट्स लिहायला लागलो. थोड्याच वेळात सर दारात (अर्थातच माझ्या बाकाच्या शेजारी) येऊन उभे राहिले.

मी जणू काही त्यांच्याकडे लक्षच नाहीये असे भासवत लिहित राहिलो. न जाणो परत चांदण्यांचा प्रसाद मिळायचा. त्यांची नजर माझ्या वहीवर गेली असावी. त्यांनी त्यांचा डावा हात माझ्या खांद्यावर ठेवला व म्हणाले – ‘अरे किती सुंदर आहे तुझं अक्षर... तू बॉलपेन नाही, तर फाउंटन पेन वापरायला हवेस. बॉलपेनने अक्षर बिघडून जाईल तुझे.’ मी होकारार्थी मान हलवली. त्यांनी विचारले ‘नाव काय तुझं?’ येथून पुढचा संवाद कसा पुढे जाणार आहे याची मला अनुभवातून कल्पना होती. ‘सतीश अनंत पाकणीकर’ मी उत्तर दिले. त्यांच्या डोळ्यात झालेला बदल मी अनुभवला. ‘अरे, मग आमचे प्रोफेसर के. खं. पाकणीकर तुझे कोण?’ माझे लगेचच उत्तर - ‘ते माझे आजोबा आहेत.’ (माझे आजोबा टिळक कॉलेज ऑफ एज्युकेशनमध्ये प्रोफेसर असल्याने आम्हाला त्या वेळी शिकवायला असणारे बहुतांश शिक्षक हे त्यांचे विद्यार्थी असत) अरे, म्हणजे तू फुले मंडईजवळ फाटक वाड्यात राहतोस. आमच्या भरत फाटकचा वाडा. मी परत एकदा मान हलवली. सरांनी माझ्या पाठीवरून हात फिरवला. पाकणीकर सरांची शिकवण्याची हातोटी किती सुंदर आहे, ते विषय कसा सोपा करून शिकवत या विषयीच्या आठवणीत सर रमून गेले. मग मला म्हणाले, ‘सरांना सांग... त्यांच्या एका सु. द. तांबे नावाच्या विद्यार्थ्याने त्यांची आठवण काढली व नमस्कार सांगितलाय.’

मला उलगडा झाला की माझ्या गालावर चांदण्या उतरवणाऱ्या हातांच्या धन्याचे नाव होते सु. द. तांबे सर. माझी व तांबे सरांची पहिलीच भेट मला आजही जशीच्या तशी नजरेसमोर उभी राहते. नंतर मला त्यांच्याकडून इ. भू. ना. म्हणजेच इतिहास, भूगोल व नागरिकशास्त्र शिकता आले. दिवाळीच्या सुट्टीत प्रश्नमालिका सोडवणे नावाचा एक छळ असायचा; पण तांबे सरांनी शिकवलेल्या विषयांच्या मालिका सोडवणे कधीच अवघड गेले नाही.

पुढे दोनच वर्षांत मी शालान्त परीक्षा दिली. विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन पदार्थविज्ञान विषयात एम एस्सीपर्यंत शिकलो. गेली पस्तीस वर्षे औद्योगिक प्रकाशचित्रकार म्हणून व्यवसाय केला; पण तांबे सरांच्या एकाच सणसणीत थपडेने व नंतर ‘फाउंटन पेन वापरायला हवेस’ या प्रेमळ सल्ल्याने त्या वेळी माझ्या खिशाला चिकटलेले फाउंटन पेन आजही मी अभिमानाने मिरवतो. त्यांच्याशी जुळलेले नाते आज इतक्या वर्षांनंतरही टिकून आहे. फक्त इतकेच नव्हे, तर आजही कधी माझ्या कॅमेऱ्यातून एखादे चांगले प्रकाशचित्र निघालेले पाहायला मिळाले, की सरांचा आवर्जून शाबासकीचा फोन येतो व घरी कॉफी प्यायला ये असा आदेशही.

सु. द. तांबे यांच्यासारख्या सर्वच शिक्षकांकडून त्यांच्या विद्यार्थ्यांवर संस्कार, संस्कृती, परंपरा, चालीरिती व आदर असे पैलू पाडले गेले. आजही ‘युवा-स्नेह’ या संस्थेच्या माध्यमातून ते तरुणाईशी सतत संपर्कात असतात. दुखण्यांमुळे त्यांच्या हालचालीवर काही निर्बंध आले असतीलही; पण उत्साह मात्र अजूनही तोच आहे. आणि त्यांच्या या अमाप उत्साहाला ‘मॅडमही’ भरभरून साथ देत आहेत.

आमच्या जीवनात आलेल्या अशा सर्वच ‘शिक्षकांची’ आज आवर्जून आठवण होते.

सर, आजही मी जेंव्हा जेंव्हा कागदावर काही लिहिण्यासाठी खिशाचे फाउंटन पेन काढतो, त्या वेळी मला १९७५ सालचे तुम्ही डोळ्यांसमोर येता आणि नकळतच माझ्या हातून कागदावर रेखीव अक्षरे उमटू लागतात.

- सतीश पाकणीकर
संपर्क : ९८२३० ३०३२०

(लेखनाचा प्रथम प्रसिद्धी दिनांक : ५ सप्टेंबर २०१८)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/GXDLCQ
Similar Posts
‘हास्यरेषांचा आनंदयात्री’ २९ जुलै हा हास्यचित्रकार शि. द. फडणीस यांचा जन्मदिन. त्या निमित्ताने, प्रख्यात प्रकाशचित्रकार सतीश पाकणीकर यांचा हा लेख...
‘ख्याल-महर्षी’ ऋषितुल्य ख्यालमहर्षी पं. मल्लिकार्जून मन्सूर यांचा स्मृतिदिन १२ सप्टेंबर रोजी होऊन गेला. त्या निमित्ताने, प्रसिद्ध प्रकाशचित्रकार सतीश पाकणीकर यांनी लिहिलेला हा लेख...
कॅमेऱ्यामागचा जादूगार! सुप्रसिद्ध फ्रेंच फोटोग्राफर हेन्री कार्तीय ब्रेसाँ यांनी सर्व फोटोग्राफर्सबद्दल असे म्हणून ठेवले आहे, की ‘आम्ही या जगातील असे प्रेक्षक आहोत, जे जगाकडे सदासर्वकाळ पाहत असतात; पण आमच्या निर्मितीचा मात्र एकच एक क्षण असतो तो म्हणजे जेव्हा आमच्या कॅमेऱ्याचे शटर एका सेकंदाच्या अंशाने क्लिक होते तो क्षण!’
स्वर-भावगंधर्व २६ ऑक्टोबर हा पं. हृदयनाथ मंगेशकर यांचा जन्मदिवस. त्या निमित्ताने प्रकाशचित्रकार सतीश पाकणीकर यांनी लिहिलेला हा लेख...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language